आपल्याच घरी काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा पात्रा असं त्यांचं नाव असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर भाजपानं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी आज रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पीडितेनं घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
नेमकं काय आहे प्रकरण?
आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. मागील आठ वर्षांपासून आरोपी सीमा पात्रा पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. त्यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय पीडित महिलेच्या शरीरावर अनेक जखमाही आढळल्या आहेत. आरोपी सीमा पात्रा यांनी आपल्याला गरम वस्तूंने चटके दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.