मुंबई: आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं दमदार विजय मिळवला. भारतीय संघानं बुधवारी हॉंगकॉंगला ४० धावांनी पराभूत केलं. या विजयासह टीम इंडिया सुपर ४ मध्ये पोहोचली.
भारतीय संघानं हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला खरा पण संघातील वेगवान गोलंदाजांनी तुलनेने निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. अर्शदीप सिंग आणि आवेश खान हे दोघेही वेगवान गोलंदाज हाँगकाँगसारख्या नवख्या संघासमोर निष्प्रभ ठरले. त्यांनी अपेक्षेपेक्षा खूपच अधिक धावा दिल्या. आवेश खान याने तर धावांचे ‘अर्धशतक’च केले.हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी तिघांनी मिळून ११ षटकांत ४८ धावा दिल्या. तर दुसरीकडे एकट्या आवेश खानने आपल्या ४ षटकांत ५३ धावा दिल्या. आवेश खानचा इकॉनॉमी रेट १३.२० प्रति ओव्हर होता. आवेश खानला चार षटकार आणि ५ षटकार लगावले. याचाच अर्थ केवळ षटकार आणि चौकारांवरच त्याने ४६ धावा दिल्या.
आवेश केवळ याच सामन्यात नाही तर, आतापर्यंतच्या टी २० सामन्यांत त्यांना खूपच धावा दिल्या. आवेशने आतापर्यंतच्या १४ टी २० इनिंगमध्ये १३ विकेट घेतल्या आहेत. पण इकॉनॉमी रेट ९ पेक्षा अधिक आहे. त्याची कामगिरी अत्यंत खराब आहे. त्यामुळे टीम इंडियात स्थान पक्कं करणं त्याच्यासाठी खूपच कठीण आहे.
अर्शदीप सिंगनेही गोलंदाजीत फारशी कमाल दाखवली नाही. हाँगकॉंगविरुद्ध तोही प्रभाव पाडू शकला नाही. अर्शदीपला चार षटकांत ८ चौकार ठोकले. त्याने दोन नो बॉलही फेकले. ही कामगिरी टीम इंडियासाठी चिंताजनक आहे.
हाँगकाँगविरुद्ध टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार फलंदाजी केली. दोघांनीही अर्धशतक केले. सूर्यकुमारने २६ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ४४ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या. तर हाँगकाँगच्या संघाने १५२ धावा केल्या. गोलंदाजीत युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी चांगली कामगिरी केली.