“न्यायव्यवस्थेने पुन्हा काश्मिरी पंडितांना…” कोर्टाच्या सुनावणीनंतर विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट व्हायरल

Entertainment

यावर्षीचा सर्वात जास्त चाललेला आणि सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट कोणता असेल तर तो ‘द कश्मीर फाईल्स’. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही अंदाज नव्हता की हा चित्रपट ३०० कोटीहून अधिक कमाई करू शकेल. चित्रपटात ३२ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्यांचा नरसंहार दाखवण्यात आला होता. प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता.
१९९० मधल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारासाठी ‘एसआयटी’द्वारा चौकशी करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळली असल्याचं समोर आलं आहे. यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर विवेक अग्निहोत्री यांनी लगेच ट्वीट करत याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ते ट्वीटमध्ये लिहितात, “पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेने काश्मिरी पंडितांना आणि तो भयंकर नरसंहार भोगलेल्या पीडितांना निराश केलं आहे. काश्मीरच्या हिंदू अल्पसंख्यांकांना हा अधिकार नाहीये.” याआधी याचिकेवरील सुनावणीच्याही आधी विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं होतं. आज न्यायव्यवस्थेची ‘अॅसिड टेस्ट’ आहे असं म्हणत त्यांनी ट्वीट केलं होतं.
‘वी द सिटीजन’ या खासगी संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत १९९३ ते २००३ या दरम्यान कश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी हिंदू तसेच शीख लोकांच्या हत्येची चौकशी व्हावी असं नमूद करण्यात आलं होतं. ही जनहित याचिका फेटाळल्यानेच विवेक अग्निहोत्री यांनी दुख व्यक्त केलं आहे. गेले कित्येक वर्षं विवेक अग्निहोत्री या चित्रपटासाठी काम करत होते. सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या ऑस्करवारीवरूनही बऱ्याच चर्चा रंगताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *