लिंगायत समाजाच्या ‘चित्रदूर्ग’ मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्या अटकेनंतर या मठातील वार्डन रश्मी यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. मठातील अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.
मठाचे सचिव परमशिवय्या सथ यांच्या निलंबनानंतर वार्डन रश्मी यांना कर्नाटक ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. एस. के. बसवराज आणि त्यांच्या पत्नीविरोधात रश्मी यांनीच लहान मुलांच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, लैंगिक शोषण प्रकरणात शिवामूर्ती मुरघा शरानारू आणि वार्डन रश्मी यांच्यासोबतच मठातील बसवादित्या, परमशिवाय आणि गंगाधिराय यांच्याविरोधात देखील पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.दरम्यान, चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखू लागल्यानंतर शिवामूर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवामूर्तींना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक करण्यात आली होती. त्यानंतर चित्रकुट जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर रात्री साडेतीन वाजता येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्याविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती.