अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. केआरके ट्विटच्या माध्यमातून प्रामुख्याने बॉलिवूडवर टीका करत असतो. त्याने स्वत:चे एक यूट्युब चॅनलसुद्धा सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चित्रपटांचे समीक्षण करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. काही वादग्रस्त ट्विट्समुळे केआरके कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
केआरकेने २०२० मध्ये निधन झालेल्या इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी अटक केली. मुंबई पोलिसांनी केआरकेला विमानतळावर अटक केली आणि दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. वादग्रस्त ट्विट्समुळे त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचदरम्यान त्याच्या विरोधात तीन वर्षांपूर्वीच्या खटल्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे. एका नवोदित अभिनेत्रीने त्याच्यावर छेडछाड केल्याचा दावा केल्याने वर्सोवा पोलिसांनी केआरकेला पुन्हा अटक केली आहे.२७ वर्षांच्या पीडित अभिनेत्रीने केआरकेने आपली छेडछाड केल्याचा दावा केला आहे. “२०१७ मध्ये मी मुंबईला कामाच्या शोधात आले. त्यांनतर एका पार्टीमध्ये माझी केआरकेशी भेट झाली. आपण निर्माते आहोत आणि तुला काम देऊ इच्छितो असे म्हणत केआरकेने माझ्याशी जवळीक वाढवली. ‘कॅप्टन नवाब’ या चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत कास्ट करणार असल्याचे आश्वासन त्याने दिले. पण तसे काहीच झाले नाही. याउलट त्याने माझा नंबर मिळवून मला फोन करुन त्रास द्यायला सुरुवात केली.” असे तक्रार करणाऱ्या अभिनेत्रीने सांगितले.