काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली. येथे नितीशकुमार यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि अन्य पक्षांना घेऊन पुन्हा सरकार स्थापन केलं. यानंतर नितीश कुमार देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आहे. २०२४ च्या निवडणुकीत तुम्ही विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर नितीश कुमार यांनी स्पष्टचं सांगितलं आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “पंतप्रधान पदाचा मी दावेदारही नाही. मला पंतप्रधान होण्याची इच्छाही नाही आहे. डावे पक्ष, काँग्रेस आणि सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन विरोधकांची मुठ बांधण्याची वेळ आली आहे. माझ्या लहानपणापासून कम्युनिस्ट पक्षाशी माझा संबंध आहे. दिल्लीला आल्यावर या कार्यालयात यायचो. डावे पक्ष, काँग्रेस आणि अन्य विरोध पक्ष आले तर मोठी गोष्ट ठरेल,” असा विश्वासही नितीश कुमारांनी व्यक्त केला.