जळगाव, 10 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठे खिंडार पडले आहे. एक एक करून 40 आमदार शिंदे गटात दाखल झाले आहे. अजूनही शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. अशातच जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यामुळे शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे पद धोक्यात आले आहे.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षीत जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. तथापि, त्यांच्या विरूद्ध पराजीत झालेले उमेदवार जगदीश वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. यातून जात पडताळणी समितीने लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात लताताईंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.