सापाला घाबरतात बिग बी; एका चित्रपटाच्या शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाले, “दिग्दर्शकाने रबराचा साप असल्याचं…”

Entertainment

महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १४’ मुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये हॉटसीटवर येणाऱ्या स्पर्धकांशी बिग बी गप्पा मारतात. स्पर्धकांशी बोलताना ते बऱ्याचदा त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी देखील शेअर करतात. अशातच कोणत्या प्राण्याची भीती वाटते, याबद्दल अमिताभ यांनी या शोमध्ये खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी एक जुना किस्साही सांगितला.९ सप्टेंबर म्हणजेच शुक्रवारच्या एपिसोडची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या फ्रायडे प्ले अलाँगने झाली. अमिताभ बच्चन यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट प्रश्न विचारला, त्याचं उत्तर सर्वात आधी नवीन कुमार यांनी दिलं. फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा राउंड जिंकल्यानंतर नवीन कुमार अमिताभ बच्चनबरोबर हॉट सीटवर बसले आणि खेळाला सुरुवात झाली.एका प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यानंतर अमिताभ यांनी स्पर्धकाला दुसरा प्रश्न विचारला. तो प्रश्न चित्रावर आधारित होता. त्यात पहिले चित्र बकरीचे, दुसरे चित्र सापाचे, तिसरे चित्र गाईचे आणि चौथे चित्र वाघाचे होते. नवीनने याचं उत्तर देताना दुसरा पर्याय निवडत अचूक उत्तर दिले. त्यानंतर आपल्याला सापांची भीती वाटते असं म्हणत सापाचे चित्र स्क्रीनवरून हटवा, असं बिग बी म्हणाले. तेव्हा स्पर्धक नवीननेही आपण सापाला खूप घाबरत असल्याचं सांगितलं.साप पाहिल्यानंतर ताप येतो, असं म्हणत बिग बींनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, “एका चित्रपटातील सीनमध्ये माझ्या छातीवरून साप जाणार होता. पण त्यावेळी भीतीमुळे माझी अवस्था काय होत होती हे मी सांगू शकत नाही. मी दिग्दर्शकाशी बोललो आणि हा सीन मी करू शकत नाही, असं सांगितलं. यानंतर दिग्दर्शकाने मला सांगितले की, साप खोटा म्हणजेच रबरचा आहे, त्यामुळे काही होणार नाही. तुम्ही तुमचे डायलॉग बोलून टाका. त्यानंतर मी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि खोटा साप असल्यास मी हा सीन करेन, असा विचार केला. शुटिंग करतेवेळी मी सापासमोर संपूर्ण डायलॉग म्हटला आणि तो सीन शूट करण्यात आला.”“त्या सीननंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यानंतर माझा असिस्टंट आला आणि मला म्हणाला की तुम्ही ज्या सापाबरोबर सीन शूट केला आहे तो खरा आहे, रबरचा नाही. तेव्हा मी आश्चर्यचकित झालो होतो आणि मी खरा साप ओळखू शकलो नाही, याबद्दल मला विश्वासच बसत नव्हता,” असं अमिताभ बच्चन म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *