अकोला, : शहरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रिक्षाचालक रस्त्यांत अचानक थांबून प्रवाशांची चढउतार करत आहेत. शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत. मागील तीन वर्षापासून बस सेवाही बंद असल्याने रिक्षाचालक अधिक दराने भाडे आकारणी करीत आहेत.
अकोला शहरात रिक्षाचालकांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरातील चौकाचौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे इतर वाहनचालकांना वाहतुकीस त्रास होत आहे. रहदारी असलेल्या चौकाचौकात रिक्षाचालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यांमध्येच प्रवाशांची चढउतार होत आहे. याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना सोसावा लागत आहे.
अकोला शहरात 18 ते 20 हजार ऑटोरिक्षा आहेत. महानगरपालिकेने 20 ठिकाणी ऑटो स्थानकांची व्यवस्था करून दिलेली आहे. मात्र, या स्थानकावर ऑटोरिक्षा दिसतच नाहीत. रस्त्यावर कुठेही जागा दिसेल त्या ठिकाणी रिक्षा उभी केली जाते. रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या मध्येच, प्रवासी जिथे हात दाखवेल तिथेच ऑटोरिक्षा थांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे अपघात होण्याची भीती आहे.