मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएने दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला अर्ज एमएमआरडीएने फेटाळला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठीचा करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती आहे. शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यांच्यातील वाद दसरा मेळाव्याच्या निम्मिताने पुन्हा एकदा दिसून येत आहे. शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाचा अर्ज एमएमआरडीने स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी ज्या मैदानाची परवानगी मागितली होती तो अर्ज फेटाळण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता शिवाजी पार्कची परवानगी दोन्ही गटांना नाकारली तरी बीकेसी मधील एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्याचा पर्याय शिंदे गटासाठी उपलब्ध असणार आहे.