राज्यातील काही दूध संघांनी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानात अपहार केल्याचा गंभीर आरोप पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तसेच या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचीही माहिती दिली. यावेळी विखेंनी सरकार शेतकऱ्यांसोबत उभं असल्याचं सांगत गरज पडल्यास शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊ, असंही म्हटलं. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“राज्यातील सहकारी दूध संघांच्या अपयशाचे परिणाम शेतकऱ्यांना का भोगावा. शेतकऱ्याला दुधाची किंमत मिळाली पाहिजे. सरकारची खासगी दूध संघांना प्रोत्साहन देण्याची भूमिका अजिबात नाही. आधीचे दूध संघ नसल्याने आपलं दूध स्विकारलं जात नाही अशी स्थिती झाल्यास आणि शेतकऱ्यांचं दूध स्विकारण्याची वेळ आली, तर सरकार नक्की दूध स्विकारेल. सरकारकडे सर्व पर्याय आहेत,” अशी माहिती राधाकृष्ण विखेंनी दिली.
विखे पुढे म्हणाले, “मागे दूध जास्त झालं तेव्हा दूध भुकटी तयार करून शेतकऱ्याला दुधाचे भाव दिले पाहिजे यासाठी सरकारने काम केलं. सरकारने पाच रुपये प्रतिलिटर अनुदान दिलं. मात्र, काही दूध संघांनी त्या अनुदानाचा गैरवापर केला. शेतकऱ्यांना ते पैसे दिलेच नाहीत. सरकारच्या अनुदानाचा दूध संघांनी अपहार केला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले जात आहेत.”