मुंबई
प्रतिष्ठित ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाला कोणताही त्रास होऊ देऊ नका, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शाळेतील गैरहजेरी, अधिकार नसताना वेतन घेणे, अशा आरोपांमुळे डिसले गुरुजी अडचणीत आले आहेत. त्यामुळे नुकताच त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामाही दिला. यासंदर्भात त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली होती.
आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसले गुरुंजीच्या भेटीबाबत अधिक माहिती दिली. फडणवीस म्हणाले, ‘डिसले गुरुजींनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझी भेट घेत आपल्या समस्या आमच्यासमोर मांडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसले यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर कुठल्याही स्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला त्रास होऊ नये. अशा व्यक्तीसोबत कोणतेही चुकीचे काम करु नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.’ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या या भुमिकेमुळे डिसले गुरुजींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
माढा तालुक्यातील परितेवाडी, कदम वस्ती या शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी सरकारी पद्धतीने आवश्यक तेथे परवानगी न घेता कामकाज केले. अधिकार नसताना पासवर्ड वापरून वेतन काढले. हजेरीपत्रक नसणे, प्रतिनियुक्तीच्या कालावधीत उपस्थिती सिद्ध न करता येणे, असा ठपका जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने अहवालाद्वारे ठेवला आहे. समितीला डिसले गुरुजी यांनी ४८५ पानांचा लेखी खुलासाही दिला आहे. मात्र, तो अद्याप मान्य झालेला नाही.
रणजित डिसलेप्रकरणावरुन शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर टीका केली आहे. हेरंब कुलकर्णी म्हणाले, डिसले गुरुंजीच्या आरोपावरील चौकशी अहवालावर अजून निणNय झालेला नाही. मात्र, त्या संपूर्ण चौकशी अहवालाची पीडीएफ खुलेआम व्हॉट्सअ?ॅपवरुन फिरतेय. डिसले गुरुजींची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा हेतूच यामागे दिसतो. आंतराराष्ट्रीय प्रसिद्धी मिळालेल्या व्यक्तीवर प्रशासन किती खालच्या पातळीवर जाऊन वार करते आहे याचा हा पुरावा आहे.
विद्याथ्र्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या साहाय्याने शिकवण्याचे तंत्रज्ञान डिसले गुरुजी यांनी सर्वप्रथम लागू केले. अध्ययनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले. मात्र, आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेल्या या गुरुजींनी कंटाळून आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. तोदेखील अद्याप मंजुर झालेला नाही.