गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी (३० जुलै) नाशिकल जिल्ह्यात मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.”