अकोला शेवटच्या श्रावण सोमवारी निघणाऱ्या राजराजेश्वरच्या कावड व पालखी महोत्सवात मातृशक्तींच्या आठ कावड गांधीग्रामला जाऊन राज राजेश्वराला अभिषेक करणार आहेत. या संदर्भात सार्वजनिक पालखी व कावड उत्सव व शांतता समितीची बैठक पत्रकार भवनात संपन्न झाली. सार्वजनिक पालखी व कावड उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती यांच्या अध्यक्षतेत या बैठकीत शांतता समितीचे अध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल, वाहतूक पोलिस निरीक्षक विलास पाटील, डॉ. अशोक ओळंबे, हभप तुलसीदास महाराज मसने, पवन महल्ले, राजेश्वर शिवभक्त मंडळाचे बंडू नायसे, ज्येष्ठ समाजसेवी गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सोमवार, २९ ऑगस्टला शेवटच्या श्रावण सोमवारी निघणाऱ्या कावड व पालखी मिरवणुकीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध दुरुस्त्या सुचवून चर्चा केली. यामध्ये काही मागण्या ठेवण्यात आल्यात. ज्यामध्ये गांधीग्राम ते अकोला रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यावर लायटिंगची व्यवस्था, गांधीग्रामला पाणी जास्त असले तर पंपाचे नियोजन करणे, राजराजेश्वर मंदिरात तुरळक बँडला परवानगी देणे, डीजे वाजवण्यास परवानगी देणे, राजेश्वर मंदिरात महिलांच्या पालख्यांनाही प्रदक्षिणाची अनुमती देणे, अकोला महानगरात दुसऱ्यांदा निघणाऱ्या महिला कावडमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे पालखी कावड मंडळांना सहकार्य करण्यात येणार असून, पालखी कावड मंडळांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करत हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.