दुबई: आशिया कप २०२२ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून भारतीय संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सुपर फोरमधील दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघ आता इतर संघांवर अवलंबून राहिला आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारली आणि त्यानंतर श्रीलंका-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव झाला पाहिजे. याशिवाय भारताने शेवटचा सामना अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने जिंकला तर भारत अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे.आता अशा परिस्थितीत आज अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभूत होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही संघांवर नजर टाकली तर असे होणे अवघड आहे. कारण पाकिस्तान हा अफगाणिस्तानपेक्षा बलाढ्य संघ आहे. अफगाणिस्तान संघानेही या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ दर्शवला आहे. अफगाणिस्तानने यापूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत केले आहे. मात्र, नंतर श्रीलंकेकडूनही पराभव पत्करावा लागला.पण टी २० फॉरमॅटमध्ये कोणत्याही संघाला हलक्यात घेता येत नाही. कारण हा असा फॉरमॅट आहे की, एखादा खेळाडू हा सामना आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद ठेवतो. असेच उदाहरण भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात पाहायला मिळाले. सर्व संघांमध्ये भारतीय संघ बलाढ्य होता, पण या बलाढ्य संघाला श्रीलंकेने अगदी सहज धूळ चारली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या हेड टू हेडबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. अशा स्थितीत आधीचे आकडे पाहिले तर त्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानपेक्षा वरचढ आहे. मात्र, श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी भारताचेही पारडे जड असल्याचे बोलले जात होते.