महाविकासची दहा मते कुणाची फुटली ?आणि राज्यसभेची एक जागा….

ताज्या घड्यामोडी ब्रेकिंग

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार खा.प्रफुल्ल पटेल

मुंबई: महाविकास आघाडीची दहा मते फुटली आणि सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’ हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. ‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असं देवेंद्र फडणवीसांनी महाडिकांच्या विजयानंतर ट्वीट केलं आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणीसांनी महाविकास आघाडीकडे शरद पवार यांच्यासारखा दिग्गज समोर असतानाही अचूक स्ट्रॅटेजी आखली आणि विजय खेचून आणला. 

राज्यसभेचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे, 

1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 42

6. धनंजय महाडिक- भाजप – 41.56

पराभूत उमेदवार

संजय पवार -33 मते

देवेंद्र फडणवीस या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आनंदाचा क्षण आहे. हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. राज्यातील लोकांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत दिलं होतं.”

धनंजय महाडिकांनी संजय राऊतांपेक्षा जास्त मतं घेतली
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी 41.5 मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना 41 मतं मिळाली. जे मत बाद झालं, ते मत ग्राह्य धरलं असतं, किंवा मलिकांना मताचा अधिकार दिला असता तरी आमचा उमेदवार निवडून आला असता. यामध्ये ज्या अपक्षांनी आम्हाला मतं दिली त्यांचे आभार. जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात, त्यांना या विजयाने लक्षात आलं असेल की ही जनता म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई आहेत. ही विजयाची मालिका सुरू झाली आहे ती आता कायम सुरू राहिल. 

चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट
हा विजय म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकीकडे मतमोजणी सुरू असताना, टेन्शन वाढलं असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. 

काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी मतदान झाल्यानंतरची विजयी पोज

देवेंद्र फडणवीसांचे करेक्ट प्लॅनिंग
धनंजय महाडिकांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात सेलिब्रेशन सुरू आहे. सकाळी 9 वाजता मतदान सुरु झालं तेव्हापासूनच भाजपमध्ये मोठा विश्वास होता. विजयी खासदार अनिल बोंडेंनी तर निकाल वर्तवलाही होता. पण तेव्हा देखील महाविकास आघाडीनं आपलाच विजय होणार असा दावा केला. हे सगळं सुरु असतानाच भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस मात्र मतदान प्रक्रियेत बिझी होते. एक-एक मत कसं आपल्या बाजूनं पडेल याकडेच त्यांचं लक्ष होते. आजारी लक्ष्मण जगताप मतदानासाठी आले, तेव्हा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी त्याचं स्वागत केलं आणि याच मेहनतीला मध्यरात्री 3.30 नंतर यश आलं.

विजयानंंतर भाजपाचा जल्लोष

महाविकास आघाडीची 10 मतं फुटली
सगळ्यात धक्कादायक म्हणजे  या निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मतं फुटली आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं, चार उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहुन निवडणुकीचं प्लॅनिंग केलं. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.भाजपकडे त्यांची आणि मित्रपक्ष मिळून 113 मत असायला पाहिजे होते पण तिन्ही उमेदवार मिळून मिळाले 123 मतं. म्हणजेच भाजपला त्यांच्यामित्रपक्षांव्यतिरिक्त 10 आमदारांनी प्रथम मत दिले आहे. ते 10 कोण असतील?

भाजपचा महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात सात तासांपासून निकाल रखडला होता.

शिवसेनेचे विजयी उमेदवार खा.संजय राऊत

सुहास कांदे यांचे मत बाद
दरम्यान, भाजपने केलेल्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं. तर यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या आणि सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा या भाजपच्या आमदारांचे मत वैध असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या मताचे गणित बिघडले. 

भाजपा विजयीउमेदवार धनंजय महाडिक

केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक
भाजप आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर केलेल्या आरोपांची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली. भाजपने केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबवण्याचा आदेश दिला. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप कुमार पांडे, मुंबईतून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्राची निवडणूक निरीक्षक अजय नायक यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक झाली आणि यावर अंतिम निर्णय झाला. 

भाजपा विजयी उमेदवार अनिल बोंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *