अकोला : महानगरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या विविध आजारांनी थैमान घातलेले आहे. व्हायरल फिव्हर सह सर्दी-खोकला,अंगदुखी अशक्तपणा, घसा दुखणे,पोटदुखी, अपचन अशा विविध आजारांनी नागरिक प्रचंड त्रस्त असून सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे. जून महिण्याच्या सुरूवातीपर्यंत प्रचंड उकाडा व वाढलेले तापमान त्यानंतर ढगाळ वातावरण, कधी पाऊस, कधी ऊन अशा बदलत्या वातावरणात जून महिना गेला. जुलैच्या प्रारंभा पासून वातावरण दररोज ढगाळ असून थंडीचे प्रमाणा वाढलेले आहे. रात्रीच्या वेळी गार वारा सुटतो. या वातावरणीय बदलामुळे तसेच अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे.
लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकापर्यंत सर्वांनाच विविध साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. जनरल फिजीशियनचे दवाखाने रुग्णांच्या गर्दीने भरलेले दिसताहेत. सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा रुग्णांच्या रांगा लागलेल्या आहेत. काही अपवाद वगळता घरोघरी साथीच्या आजारांचे रुग्ण असल्याचे समजते. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे.
अस्वच्छताही कारणीभूत
शहरात पावसाळा सुरू होवून दिड महिना होत आला.तरीही नाल्यांची सफाई पूर्णपणे झाली नाही.त्यामुळे नाल्या तुंंबतात. अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच मोकळ्या मैदांनामध्ये, खुल्या भुखंडांमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून या डासांच्या माध्यमातून विविध आजार पसरत आहेत. पण या परिस्थितीकडे लक्ष देवून उपाय योजना करण्याची महापालिकेला गरज वाटत नाही.डासांचा प्रादूर्भाव व उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून औषध फवारणी केली जात नाही. अशी नागरिकांची तक्रार आहे. महापालिकेच्या फॉगींग तसेच सॅनिटाईझिंग मशिन आहेत कोठे असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.