बहुमत गमावल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. असे असताना अनेक शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांना लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी झालेला सत्तासंघर्ष विसरुन सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना कोणी सोबत येईल किंवा नाही, याबाबत विचार करु नका. तयारी करा, असे निर्देश दिले आहेत.याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. आज सकाळी अकरा वाजता शऱद पवार आणि मुंबईतील पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात कार्यकर्त्यांना संबोधित केले. “कोणी सोबत येईल की नाही, याचा विचार न करता तयारी करा;” असे निर्देश यावेळी शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.