गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
अन्न व औषध विभाग संजय राठोड यांच्याकडे
मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम
मुंबई,
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसुल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणून जबाबदारी असेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री असतील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री म्हणून जबाबदारी असेल. डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय, तर ग्राम विकास तसेच वैद्यकिय शिक्षणाची जबाबदारी ही गिरीष महाजन यांच्याकडे असून क्रीडा व युवक कल्याण विभाग त्यांच्याकडे आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, तर दादा भुसे यांच्याकडे बंदरे तसेच खनिकर्म विभाग देण्यात आला आहे. संजय राठोड यांच्याकडे महत्वाचा अन्न व औषध प्रशासन विभाग सोपविण्यात आला आहे. सुरेश खाडे यांच्याकडे कामगार विभाग देण्यात आला आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभाग सोपविण्यात आला. उदय सामंत यांच्याकडे उद्योग विभागाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली.
प्रा.तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाची जबाबदारी आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देखील असेल.अब्दुल सत्तार यांच्याकडे महत्वाचे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाची जबाबदारी सोपविली आहे.अतुल सावे यांच्याकडे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सोपविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी ही शंभुराज देसाई यांच्याकडे आली आहे. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्रालयाचा कारभार असेल.