प्रसूती काळात महिलेचा मृत्यू, मातृत्व हरवलेले बाळ सुखरूप

Maharashtra State

जन्मत:च आईपासून बाळाला पोरके व्हावे लागल्याची घटना नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे घडली. त्यात जन्म दिलेले बाळ सुखरूप असून त्याची जन्मदातीचा मात्र मृत्यू झाला आहे. शालिनी सुरज ढोके (वय ३३) या रात्री २ वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्याची प्रकृती नॉर्मल असल्यामुळे व प्रसूतीची वेळ आल्यामुळे डॉ. जयंत कोहाड याच्या देखरेखीखाली रात्री १.४५ डिलिव्हरी नॉर्मल झाली. त्यांनी बाळाला जन्म दिला. परंतु प्रसूती झाल्यानंतर रक्त प्रवाह थांबत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी त्यावर उपचार सूरू केले. तरीही रक्त प्रवाह थांबत नसल्याने व शालिनीची प्रकृती खालावत असल्यामुळे डॉक्टरनी तिला योग्य वैद्यकीय उपचाराकरिता नागपूरला रेफर केले. मात्र प्रकृती अतिशय खालावल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी तिला काटोल येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यानंतर शालिनीचा मृतदेह काटोल येथून नरखेड ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनाकरता पाठविण्यात आला. मृतक महिलेचे पती सुरज ढोके यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्याची सखोल चौकशी करून डॉक्टरांवर कारवाईची मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे. दरम्यान नागपूर येथून घटनेची चौकशी करण्याकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मडावी व डॉ. संजय उज्जैनकर आले होते. त्यांनी ३० ते ३३ वयाच्या महिलेची प्रसूती ही हाय रिस्क वर्गवारीत मोडल्या जाते. त्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या कालावधीला सुवर्ण काल समजला जातो. परंतु धोकाही जास्तच असतो. परंतु येथील डॉक्टर, नर्स यांनी केलेली प्रसूती व त्या अनुषंगाने तयार केलेला रुग्णाबाबतचा रेकॉर्ड योग्य असून प्रसूतीची क्रिया योग्य तऱ्हेने पार पडल्याचे दिसून येते असे स्पष्ट केले आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञाची मागणी ः येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे गरोदर माताची परवड होते. जवळपास सुसज्ज सरकारी दवाखाना नसल्यामुळे गरोदर मातांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ ह्या रुग्णालयात असावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *