प्रथमच एवढे शिक्षक होतील रुजू
शाळांची शिक्षण प्रणाली होईल बळकट
राज्यातील चार हजार शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत अकोला जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सव्वा दोनशे शिक्षक रुजू होणार आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या स्थापने नंतर पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात शिक्षक जिल्ह्यात रुजू होणार आहेत.
ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा अभाव आहे. जिल्हा परिषदेची शिक्षण प्रणाली दिवसेंदिवस कोलमडत चालली आहे. त्यातच अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेवर एकच शिक्षक असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील आंतर जिल्हाबदली प्रक्रियेत 3943 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यात अकोला जिल्हा परिषदेच्या खात्यात 221 शिक्षकांचे प्रस्ताव आले आहेत. तसेच अकोला जिल्ह्यातून 17 शिक्षकांना बदली देऊन इतर जिल्ह्यात रुजू होण्याचे प्रस्ताव तयार होणार आहेत. जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाला 221 शिक्षकांची भेट राज्य शासनाकडून मिळाली आहे. तसेच अकोला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला या शिक्षकांचा मोठा फायदा होऊ शकतो. या आंतर जिल्हा बदली प्रक्रिया मुळे ग्रामीण पातळीवरील कोलमडलेली शिक्षण प्रणाली पुन्हा बळकट होण्याचे संकेत आहेत.