पाच हजार लोकवस्ती असणाऱ्या आगर गावातील व आजूबाजुच्या खेड्यातील तीन दिवसपासून वीजपुरवठा खंडीत झाला असून, त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावकऱ्यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.
मागील आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्यूत तारा तुटल्या त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढवी लागली होती. आता काही कारण नसताना सुद्धा वेळोवेळी गावातील वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे वातावरण दिसले की, या भागांतील गावांमधील वीजपुरवठा बंद करण्यात येतो. काही दिवसांपासून अचानक गावातील व आजुबाजुच्या खेड्यातील वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बाळंतिण महिलांना व लहान मुलांना डास चावल्याने त्याच्यामध्ये तापीचे प्रमाण वाढले आहे. आता पावसाळाचे दिवस असल्याने रात्रीच्या वेळी सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा धोका वाढला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आगर या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.