अकोला – महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने सत्ताधारी पक्षावर टिका करताना दिसून येतात. नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर ते ५० खोक्के एकदम ओके म्हणत हल्लाबोल करताना विधानसभेच्या पायऱ्यांवर दिसून आले. सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अमोल मिटकरींवर गंभीर आरोप करण्यात आले. आता, याप्रकरणी चौकशी करण्याचे सूतोवाच भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहेत.
अमोल मिटकरी हे निधी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतात असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला. त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद वाढत चालल्याचे दिसून आले. समाजात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ५ कोटींचा मानहानीचा दावा आता मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर केला. तशी नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याच नोटिसीवर ‘मैं झुकेगा नहीं’, असा पलटवार मोहोड यांनी केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यासह अन्य दोघांना ही मानहानीची नोटीस बाजवण्यात आली आहे. आता, अकोला दौऱ्यावर असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, मिटकरींवर कारवाईचे संकेतही दिले आहेत.
मिटकरी यांच्या संदर्भात आरोप फार गंभीर आहेत. सरकार त्यामध्ये निःपक्ष चौकशी करेल, असं मंत्री विखे पाटील म्हणाले. तसेच, मागील काळात माहाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी मिटकरींनी बोलताना वागताना भान ठेवायला हवं. वाट्टेल त्या पद्धतीने वाचाळपणा सुरू होता, कुठेतरी त्यांच्यावर आवर घालायाला हवी होती. काही लोकांनी लोकशाहीमध्ये वाचाळपणा करणे उचित नाही. त्यांच्या पक्षाचे नेत्यांनी हा विचार केला पाहिजे. आपल्या या अशा बेलगाम लोकांमुळे पक्ष बदमान होतोय, पक्षाचं नेतृत्व बदनाम होतोय. पण जर पक्षाच्या नेतृत्वाची त्यांना संमती असेल, तर हे दुर्दैवी आहे, असा टोलाही महसूल मंत्र्यांनी लगावला.
मिटकरींवर कारवाईची भाजपची मागणी
निधी देण्यासाठी कमिशन घेत असल्याचे आरोप आमदार मिटकरी यांच्यावर करण्यात आले आहेत. पातूरच्या महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? एका काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला दहा लाख रुपये कशासाठी दिले? व एका पुण्याच्या महिला पदाधिकाऱ्याचं रेस्ट हाऊसवर अकोल्यात तीन दिवस मुक्काम कशासाठी होतो? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी मिटकरींना केले आहेत. या प्रकरणी मिटकरींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपने केली आहे.