डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा.डॉ. शरद गडाख यांची निवड

अकोला
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांची नियुक्ती महामहिम राज्यपाल तथा प्रतिकूलपती  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केली आहे. ते विद्यापीठाचे 22 वे कुलगुरू म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती कुलसचिव प्रा. डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी दिली आहे.

अकोला विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप मालखेडे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. अमोल मिटकरी, मा. आ.विप्लव बाजोरिया, श्री. विठ्ठल सरप पाटील, डॉ. विजय माहोरकर, विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक संशोधन प्रा. डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण प्रा. डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण प्रा. डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी प्रा.डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या प्रा. डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव प्रा. डॉ. सुरेंद्र काळबांडे, यांचे सह सर्वच सहयोगी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख,विद्यापीठ नियंत्रक, अधिकारी- कर्मचारी, कामगार तथा विद्यार्थी वर्गानी नवनियुक्त कुलगुरू प्रा डॉ. शरद गडाख यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. शरद गडाख सध्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्य करत आहे. त्यांची कृषि विद्यापीठात 38 वर्ष सेवा झाली आहे. या सेवेकाळात त्यांनी विविध पदावंर काम केलेले आहे. त्याच्या कार्यकाळात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठात राबविले. यामध्ये विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणने, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरु करणे, फळबागेखाली लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प,देशी गाय संशोधन अंड प्रशिक्षण केंद्र, शेती मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, जास्तीत जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे, बिजोत्पादन वाढविणे, एकात्मिक शेती पध्दत मॉडेल, मॉडेल व्हिलेज इ. नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. यामुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पादनात वाढ होवून शेतकर्यांना त्यांच्या जिल्ह्यातच विद्यापीठाचे उत्पादने उपलब्ध झाली. तसेच शेतकरी प्रथम आणि मॉडेल व्हिलेज संकल्पनेमुळे कृषि विस्तारामध्ये नविन मापदंडे स्थापीत झाली.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे. त्यांचे आत्तापर्यंत 80 संशोधन लेख, 43 तांत्रिक लेख, 144 विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. ते दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कृषि कार्यक्रमातून शेतकर्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांनी विकसीत केलेल्या ज्वारीच्या पंचसुत्री व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांना कोरडवाहू ज्वारीचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तारातील अभुतपूर्व योगदानामुळे त्यांना जागतिक स्थरावरील एक पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार आणि राज्य पातळीवरील सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या निवडीमुळे राज्याच्या सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात विदर्भातील शेती आणि शेतकरी विकासाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *