नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच त्यांच्या ७७ सदस्यीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी त्यांची वॉर टीम निवडणार आहेत. भाजपाने संघटनात्मक परिवर्तन केले आहेत आणि २०१९ मध्ये विजय मिळवू न शकलेल्या १४४ लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचे काम पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. लवकरच राज्यपालांचेही परिवर्तन होऊ शकते, असे संकेत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ११ राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे कठीण काम मोदींपुढे आहे. महत्त्वाची मंत्रालये पाहणाऱ्या काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यामुळे त्यांचे विभाग बदलले जाऊ शकतात किंवा त्यांना बाहेरचा दरवाजा दाखविला जाऊ शकतो. शिवसेनेच्या शिंदे गटालाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. जनता दल युनायटेड आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मंत्रिमंडळातून यापूर्वीच बाहेर पडलेली आहे. भाजपाला बिहारमध्ये रणनीती पुन्हा आखावी लागणार आहे.