अयोध्या : पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या तीन चार वर्षात चौथ्यांदा अयोध्येत आलो आहे. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हजारो शिवसैनिक आले आहेत. आमच्या सोबत जो उत्साह आहे, जल्लोष आहे तो आपण देशाला दाखवावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. नोव्हेंबर २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो होतो. त्यावेळी पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा केली होती. त्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत कोर्टानं आदेश दिला. राम मंदिर उभारलं जातंय यासंदर्भात कोर्टाचे आभार मानतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी परवानगी मागणार आहे. महाराष्ट्रातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी १०० खोल्यांचं सदन उभारण्यासाठी परवानगी मागणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. आमच्या हातातून देशाची सेवा व्हावी,अशी भावना आहे. शिवसेना निवडणुकीत जे वचन देते ते पूर्ण करते. आम्ही इथं राजकारणासाठी येत नाही, श्रद्धेचा विषय असल्यानं येतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आज सकाळी महंतांबरोबर बोलण झालं. आज अयोध्येत आहोत अयोध्येची चर्चा करुया. संसदेनं विशेष कायदा करुन राम मंदिर उभारावं अशी भूमिका होती. मात्र, तस झालं नाही. कोर्टाच्या आदेशानं मंदिर उभारलं जात आहे, त्याचा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.