अकोला – आपल्या प्रेयसीच्या विरहात प्रियकरांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिण्याचे अनेक प्रकार आपण ऐकले असणार, मात्र अकोला जिल्ह्यातील हिवरखेडच्या गावकऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने रक्तसंकल्प अभियान करून शासनाचे लक्ष वेधलं. हिवरखेडच्या गावकऱ्यांनी थेट आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलं.
असा सुरू आहे हिवरखेड गावकऱ्यांचा संघर्ष..
विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी, यासाठी मागील २२ वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपंचायतची उद्घोषणा करण्यास विलंब करतेय. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आत्मदहन इशारा, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी आणि बाजारपेठ बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली.
गांधीगिरी पद्धतीने केलं रक्तसंकल्प अभियान…
अनेक आंदोलने झाली. मात्र, शासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्याने शासनाला जागे करण्यासाठी हिवरखेड गावकऱ्यांनी रक्त संकल्प अभियान केले, हिवरखेड नगरपंचायत साठी आणि हिवरखेड, तेल्हारा व आडसुळ या प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावावी, यासाठी विविध सामाजिक संघटनांमार्फत हिवरखेड येथे रक्त संकल्प अभियान व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. या अभियानाला अनेक व्यक्तींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी डॉ बीपी ठाकरे ब्लड बँक तर्फे डॉ संतोष सुलताने आणि त्यांच्या चमूने रक्त संकलित केले. सोबतच हिवरखेड वासियांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री बच्चू कडू, आमदार अमोल मिटकरी, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी निमा अरोरा व इतर अनेक वरिष्ठांना रक्ताने पत्र लिहिले. रक्तदात्यांनी रक्तदान करून हिवरखेड नगरपंचायत व रस्ता निर्मितीसाठी यांचा हा लढा सुरु आहे.